अकोला: कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यासाठी आज अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी कृषिमंत्री म्हणाले की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत. अंतिम आणि वस्तुनिष्ठ पंचनामे आले की, कोणत्या पिकाला किती अनुदान द्यायचे हे केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषानुसार ठरविले जाईल. तसेच त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यस्तरावर तातडीने प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी: माझ्या 42 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत एवढा अवकाळी पाऊस पहिल्यांदाच पडत आहे. शेतकरी अस्मानी संकटाने त्रस्त आहे. शासनाकडून त्यांना हवी ती मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही अब्दुल सत्तारांनी दिली.
तर त्याबद्दल सावंतांनाच विचारा: उद्योग मंत्री उदय सावंत आमचे नेते आहेत. ते जे म्हणाले त्याबद्दल सत्यच असेल. ठाकरे गटाचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात असतीलही; परंतु या संदर्भात तेच तुम्हाला सांगू शकतील. या मुद्द्यावर उद्धव ठाकरे हे त्यांच्या शैलीमध्ये उदय सामंतांचा समाचार घेतील आणि उरले-सुरले शिवसेनेत येतील, अशी मिश्किल टीकाही कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केली.
फळबागा मातीमोल: अकोला जिल्ह्यात रविवारी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा सर्वात जास्त फटका अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. येथील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वडाळी देशमुख या गावातील केळी, लिंबू, चिकूच्या बागा उन्मळून पडल्या आहेत. अनेक झाडे मुळासकट पडले आहे. यामुळे फळबाग शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अकोट तालुक्यात नुकसान: अकोट तालुक्यामधील अवकाळी पाऊस व चक्रीवादळ यामुळे गावातील तारे तुटलेली आहेत. फळ वागांमधील मुख्य केळी, चिकू, लिंबू, कांदा, झाडावरील परिपक्व झालेले केळीचे घड, लिंबू, चिकू जमीनदोस्त केली. सर्व झाडे चक्रीवादळाने नष्ट झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी येथील फळबाग शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा: Drug Peddlers Arrested: अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना रंगेहात अटक; 40 लाखांचा माल जप्त