अकोला - शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ भाजपकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज शनिवारी पक्ष कार्यालयात 370 इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली.
भाजपचे माजी मंत्री संजय कुटे, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह कोअर कमिटीच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 53 जिल्हा परिषद आणि 106 पंचायत समिती सदस्यांसाठी या मुलाखती घेतल्या जात आहे. शेकडो पदाधिकारी या मुलाखतीसाठी आले आहेत. दरम्यान यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचलं का? - तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता ? शिवसेनेचा मोदींना सवाल
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार व निवडणूक आयोगाला आरक्षणासंदर्भातील माहिती ३ दिवसात देण्याचे आदेश दिले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुकीची पुढील प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.
अकोला, वाशिम, नागपूर, नंदुरबार आणि धुळे या ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाले आहे. यासंदर्भात न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला केली होती. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवत राज्य सरकार व निवडणूक आयोगाला आरक्षणासंदर्भातील कागदपत्रे 16 डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतरच निवडणूक तक्रारीबाबतची कारवाई निश्चित होणार आहे.
हे वाचलं का? - 'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. 18 डिसेंबरपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्जाची छाननी व 7 जानेवारी 2020 ला मतदान होणार आहे. या प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा मुद्दा अद्यापही कायम असला, तरी याचिकाकर्त्यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.