अकोला - भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदार संघातून नामनिर्देशनपत्र सादर केले. सेना-भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
लोकसभा निवडणुकीचा नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी भाजप-सेनेचे उमेदवार विद्यमान खासदार संजय धोत्रेंनी सकाळी भाजप कार्यालयापासून रॅली काढली. त्यानंतर मोठ्या संख्येने सेना-भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिली. तेथून ते जिल्हाधिकारी कार्यलयात दाखल झाले आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासमक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
यावेळी त्याच्याबरोबर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार गोपिकीशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल,भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, अॅड. विजय जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.