अकोला - अकोट तालुक्यातील बोचरा गावातील अनेक शेतकरी पाणीटंचाईमुळे केळीचे पीक काढून टाकत आहेत. जून महिन्यात लावलेले पीक उष्णतेमुळे तग धरत नसल्याने हे पीक काढण्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. यापूर्वीही काही शेतकऱ्यांनी याच कारणाने केळीचे पीक काढून टाकले होते.
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोचरा गावासह इतर गावात बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाणी मिळणे शक्य नाही. त्यामुळे ते आपल्या केळीच्या बागा वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, त्यांचीही धडपड पाण्याअभावी व्यर्थ जात आहे. मागील वर्षी येथील केळी परदेशात गेली होती. यावर्षी मात्र, स्थानिक बाजारातदेखील जाण्यास ही केळी तयार झाली नाही. केळीच्या बागेला पाणी मिळावे, यासाठी काही शेतकऱ्यांनी ११ ठिकाणी बोर खोदली. मात्र, त्यापैकी फक्त २ ठिकाणीच पाणी लागले. त्यावरील पाण्यानेही केळी तग धरत नसल्याने शेतकरी केळीच्या बागा काढत आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.