अकोला- बाळापूर पंचायत समितीमध्ये अनेक शिक्षकांना २० ते ८० हजारापर्यंत अतिरिक्त वेतन दिले गेल्याचे सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करताना समोर आले आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर पंचायत समितीमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त वेतन दिले गेल्याचे समोर येऊ शकते.
बाळापूर पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी अरुण साखरकर यांनी हा घोळ समोर आणला आहे. बाळापूर पंचायत समितीमध्ये सुमारे ४५० शिक्षक कार्यरत आहेत. तर जिल्हातील सातही पंचायत समितीत ३ हजारच्या जवळपास शिक्षक कार्यरत असल्याने हा घोळ कोट्यवधी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.
निर्धारित वेतनापेक्षा जास्त वेतन देण्याचा हा प्रकार किती वर्षांपासून सुरू आहे, हे सांगणे कठीण आहे. मात्र, सातव्या वेतन निश्चितीसाठी करण्यात आलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली. जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग आणि जिल्ह्यातील ७ पंचायत समितींच्या आर्थिक कारभाराची चौकशी करणे गरजेचे आहे.
शिक्षकांना जादा वेतन देण्याचा प्रकार उघडकीस आणल्याने अरुण साखरकर यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सत्कार केला. बाळापूर पंचायत समितीच्या शिक्षकांचा वेतनाचा घोळ समोर आल्यानंतर इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.