अकोला - दूध उत्पादक शेतकरी दुधाला भाववाढ मिळावी, यासाठी आंदोलन करत आहे. हे आंदोलन त्यांचे योग्य असले तरी सरकार या शेतकऱ्यांच्या बाजूने असून, यासंबधी सरकार सकारात्मक विचार करणार आहे. त्यांना भाव व अनुदान मिळाले पाहिजे, या बाजूने मीसुद्धा असल्याचे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बच्चू कडू बोलत होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत असलेल्या आंदोलनाबाबत त्यांना विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यभरात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दुधाला भाववाढ मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. ही शेतकऱ्यांची मागणी योग्य असल्याचे शेट्टी म्हणाले. दुधाला भाव भेटलाच पाहिजे. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. राज्य सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ही सरकारची असल्याची पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले. शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनाला तुम्ही कसे पाहता, असे विचारले असता ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहेत. त्याकडे वेगळ्या नजरेने न बघता त्यांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत असेही बच्चू कडू म्हणाले.