अकोला - मुर्तीजापुर ते पिंजर मार्गावरील पातुर नंदापुर फाट्याजवळ ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नंदापूर फाट्याजवळ गुरुवारी रात्री ऑटो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऑटो मधील सहा प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी झाले आहे. घटनास्थळी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक विकी साटोटे हे होते. तत्काळ त्यांनी पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना या अपघाताबद्दल माहिती दिली.
हेही वाचा - सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही - बाळासाहेब थोरात
दरम्यान, घटनास्थळावर पोहचुन पथकाच्या रुग्णवाहिकेने जखमींना पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. जितु पंडीत, गोविंदा पवार, बबन वानखडे, महादेव वानखडे, पुनम भेंडारकर, लक्ष्मण मेंढे यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
यावेळी पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, स्वयंसेवक ऋषीकेश तायडे, राहुल जवके, सुरज ठाकुर, यांनी सर्व जखमींना पथकाच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले. तसेच, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पिंजर पोलीस दाखल झाले.