अकोला - अकोट दक्षिण झोनचे सहायक अभियंता हे दारू पिऊन गावात वीजबिल वसुलीसाठी येत असल्याचा आरोप पाथर्डी येथील ग्रामस्थांनी केला आहे. सहायक अभियंत्यास दारू पिऊन आल्यावर ग्रामस्थांनी त्यांचा व्हिडिओ काढून तो व्हायरला केला आहे. तसेच त्या अभियंत्याची तक्रार पालकमंत्री आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. ही घटना 17 सप्टेंबर रोजीची आहे. दरम्यान, सहायक अभियंता सरकटे यास रविवार 19 सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी आज दिली.
इतर कर्मचाऱ्यांनी काढला पळ
अकोट दक्षिण वीज वितरण केंद्रांतर्गत पाथर्डी या गावात वीजवितरण कंपनीचे कर्मचारी हे वीजबिल वसुलीसाठी गावात सकाळपासून आले. त्यामध्ये सहायक अभियंता श्री. सरकटे हे दुपारी पाथर्डी येथे दारू पिऊन आले. ग्राहकांसोबत वाद घातला. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी वसुली सोडून पाथर्डी गावातून पळ काढला. सरकटे हे कर्तव्यावर असताना गावात दारू पिऊन आले. त्यांनी ग्रामस्थांशी अरेरावी केली. त्यामुळे ग्रामस्थ एकत्र झाले. ग्रामस्थांनी त्यांना पकडून त्यांना जाब विचारला. सरकटे हे ग्रामस्थांना म्हणत होते, ' काही विषय नाही, तुमचेही काम करून टाकू'. मात्र, ग्रामस्थ त्यांना जाब विचारत होते. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. शेवटी गावकऱ्यांनी त्यांचा व्हिडिओ काढला. तो व्हायरल केला. तसेच पालकमंत्री बच्चू कडू, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली.
सहायक अभियंत्यास केले निलंबित - अधीक्षक अभियंता
सहायक अभियंता सरकटे यांच्याबद्दल तक्रार दाखल झाली होती. तसेच त्यांच्याबद्दल आधीच्याही तक्रारी होत्या. वीजबिल वसुली बाकी होती. कर्तव्यात कसूर होता. त्यामुळे त्यांना रविवारी, 19 सप्टेंबर रोजीच निलंबित केले असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी सांगितले.