अकोला - शहरातील काही भागात होणारी मोठ्या प्रमाणातील वीजचोरी ही गंभीर समस्या आहे. यावर कायमचा अंकुश लावण्याचे काम सध्या महावितरणने हाती घेतले आहे. याअंतर्गत सर्वाधिक वीजचोरी होणाऱ्या शहरातील ११ फिडरवर एरिअल केबलिंग करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज चोरीला आळा बसणार आहे.
महावितरणाच्या ७० फिडरद्वारे शहराला वीजपुरवठा केला जातो. यात जुन्या शहरातील शिवसेना वसाहत, अकोटफैल, खदान भाग, डाबकी रोड परिसरातील ११ फिडरवरून सर्वाधिक वीजचोरी होते. या फिडरला पुरवठा होणाऱ्या वीजेपैकी ७० टक्के वीज अनधिकृतरित्या वापरली जाते. याचा भार महावितरण व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रामाणिक ग्राहकांवर पडतो. यापूर्वी देखील या भागात वीजचोरी रोखण्यासाठी विविध संकल्पना आखण्यात आल्या, पण त्या यशस्वी ठरू शकल्या नाहीत.
अपघाताचे प्रमाण घटणार -
उघड्या वीज तारांमुळे अपघात होतात. पावसाळ्यात या अपघातांचे प्रमाण अधिक असते. यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने कोटेड केबल महत्त्वाचे ठरणार आहेत. शहरातील ३० टक्के भागात सध्या केबलिंगची कामे केले जात आहेत. यामुळे या भागात पुढे वीजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.