अकोला - जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळी आल्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने हे खराब झाले आहे. नगदी पीक असलेल्या कपाशीवर आलेल्या बोंडआळीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान या संदर्भात कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्याकडून योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी वाचवता आली नाही. त्यामुळे शेतकरी कृषी अधीक्षक कार्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांवर नाराजी व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना मांडली व्यथा
अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा 'ईटीवी भारत'शी बोलताना मांडली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोल्यात असतानाही बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच जिल्हा प्रशासन आणि कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे योग्य ती पावले न उचल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. बोंडअळीच्या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कुठलाही सर्वे किंवा पंचनामा करण्यात आलेला नाही. त्यामुळे बोंडअळीपासून झालेली नुकसान भरपाई मिळेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.