अमरावती - पदवीधर मतदारसंघासाठी एकुण २३ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात ३५ हजार २७८ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली होती. यात २३ हजार ७८५ पुरुष तर ११४९३ महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी सुमारे २० हजार ७६८ मतदारांनी मतदान केले. यात १४ हजार ९५२ पुरुष तर ५ हजार ८१६ महिलांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांच्या ५३ चमू कार्यरत होत्या. मतदान प्रक्रियेमध्ये २७६ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क - पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढुन सकाळी साडेदहा वाजता अभ्यंकर कन्या शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी स्नेहल कनिचे, प्रशासनातील इतर अधिकारी यांनी सुद्धा आज पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदान केले.
सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाचा दावा - या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी २ फेब्रुवारीला होईल. मतमोजणी ही अमरावती येथील नेमाणी गोडावून मध्ये होणार आहे.
यश नक्की मिळेल - रणजित पाटील : सध्या अमरावती पदवीधर निवडणूक जोरदार चर्चेत आहे. डॉ. रणजित पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तिसऱ्यांदाही विजयाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांच्या संवाद आणि संपर्काच्या जोरावर यशाचे फळ नक्की मिळेल असे रणजित पाटील यांनी म्हटले आहे.
आरोप-प्रत्यारोप - काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे आणि अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्यात मोबाईल फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे हे काँग्रेस हा बोगस पक्ष आहे, अशी टीका करताना स्पष्ट ऐकू येत असल्यामुळे ही ऑडिओ क्लिप अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा: Teacher Graduate Election Voting : वादळी घडामोडीनंतर शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी मतदान