अकोला - तब्बल आठ महिन्यानंतर सुरू झालेल्या अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यात आले. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी वेळ लागला.
राज्य सरकारने टाळेबंदीत बंद केलेली सर्व धार्मिक स्थळे आजपासून खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह होता. सरकारच्या नियमाप्रमाणे भाविकांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज राजेश्वर मंदिर संचालक मंडळाने व्यवस्था केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या भाविकांचे स्कॅनिंग करून त्यांच्या हातावर सॅनिटायझर टाकण्यात आले. त्यानंतर येथे बसलेल्या भाविकांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. पास नसलेल्या भाविकांना परत पाठविण्यात आले. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी प्रवेशद्वारावरच मास्क उपलब्ध करून दिले.
भाविकांमध्ये सहा फुटांचे अंतर-
राजराजेश्वर मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर भाविकांनी सहा फुटांवर उभे राहावे, यासाठी आखणी करण्यात आली. तशी व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये, याची काळजीही सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यामुळे भाविकांना दर्शन घेणे सोपे झाले.
मंदिराचे मुख्यद्वार ठेवले बंद
राजराजेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले. त्यामुळे भाविकांना राजराजेश्वर पिंडीजवळ जाता आले नाही. त्यामुळे तेथे गर्दीही होऊ शकली नाही. या व्यवस्थेमुळे भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाली असली तरी मंदिर प्रशासनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमाची अंमलबजावणी केली.
सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे आजपासून खुली-
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये मार्चमध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे देशातील प्रार्थनास्थळेही बंद होती. राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरे उघडावी अशी मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. त्यानंतर राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईमधील अनेक मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आजपासून उघडण्यात आली आहेत.