अकोला - जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीला खिंडार पडले आहे. या पक्षातील माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि माजी आमदार हरिदास भदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.
वंचितचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची गेले अनेक दिवस चर्चा होती. मात्र, कोरोनाचे संकट आणि मुंबईत आलेले चक्रीवादळ यामुळे या राजकीय घडामोडी होणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र, माजी आमदार शिरस्कर व भदेंनी अखेर हातावर घड्याळ बांधले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीत फूट
वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हे नेेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत होते. पंढरपूर येथे झालेल्या मेळाव्यात ते अग्रभागी होते. मात्र तेच नेते सोडून गेल्याने अकोल्यात वंचित पक्षाला हादरा बसला आहे. माजी आमदार भदे व सिरस्कार यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीनामे दिले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत फूट पडली. माजी आमदार भदे हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. मात्र, अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटातच अकोला जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.