अकोला - उन्हाळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र तापत असताना अकोल्याच्या तापमानात आज सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झालेली पाहायला मिळाली. अकोल्याचे तापमान बुधवारी ४५.१ अंशांवर होते. तर आज हे तापमान ४६.३ अंशावर गेले आहे.
तापमान वाढीमुळे अकोलेकरांची लाही-लाही होत आहे. बुधवारी अकोल्याचे तापमान ४५.१ अंश होते. हे तापमान देशात दुसऱ्या क्रमांकाचे ठरले होते. आज असलेल्या ४६.३ अंश तापमानाने अकोल्यातील एप्रिल महिन्यातील उच्चांक गाठला आहे. याआधी एप्रिल महिन्यात इतके तापमान कधीच नसल्याचे समजते. तसेच असे तापमान मे महिन्यात मध्य आणि शेवटच्या आठवड्यात राहते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमान अचानक वाढल्याने अकोलेकरही घराच्या बाहेर निघण्याचे टाळत आहेत. ते सायंकाळी ७ वाजल्यानंतर घराबाहेर पडत आहेत. मात्र, सायंकाळीही गरम हवेच्या वाफा लागतात. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत.
एप्रिल महिन्यातील तापमानाचा हा उच्चांक असून, असे तापमान मे महिन्याच्या शेवटी राहत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या २ दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाल्याने 'हिट वेव्ह' असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अकोल्याचे आजचे किमान तापमान २७.२ अंश तर कमाल तापमान ४६.३ अंश होते. तर विदर्भातील अमरावतीत ४५ अंश, ब्रम्हपुरीत ४५.५, चंद्रपुरात ४५.४ आणि वर्ध्यात ४५.५ अंश तापमान होते.