अकोला - संचारबंदीच्या आधी तक्रारदार आणि ताब्यात घेतलेल्यांना भेटण्यासाठी आलेल्यांमुळे सर्वच पोलीस ठाणे गर्दीमय असायची. परंतु, या गर्दीची जागा संचारबंदीनंतर पोलिसांनी पकडलेल्या वाहनांनी घेतली आहे. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात अशीच परिस्थिती आहे. वाहने पकडली तर ती ठेवायची कुठे असा प्रश्न पोलिसांना पडत आहे. तरीही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली नाही. अकोला पोलिसांनी पाच हजारांवर वाहने पकडली असून त्यामध्ये दुचाकींची संख्या मोठी आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी देशभरात संचारबंदी आहे. या काळामध्ये देशातील गुन्हेगारीचे प्रमाण फारच कमी झाले आहे. त्यासोबतच पोलीस ठाण्यांमधील तक्रारींच्या प्रमाणातही तक्रारींच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. दरम्यान, संचारबंदीच्या काळात मात्र पोलिसांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे; ती म्हणजे विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांची. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावावर बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून दंडुका दाखविण्यात येत असून वाहने जप्त करून ती ठाण्यात ठेवण्यात येत आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याआधी तक्रारदार किंवा पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना भेटण्यासाठी येणार्यांची गर्दी असायची. मात्र, आता ही गर्दी पूर्णपणे पोलीस ठाण्यात दिसत नाही, तर पोलीस ठाण्यात आता नागरिकांपेक्षा वाहनांची संख्या दिसून येत आहे. संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून जिल्ह्यात पाच हजारांवर वाहने जप्त केली आहे. ही वाहने सोडताना प्रशासनाला चांगलाच महसूल मिळणार आहे. पोलीस ठाण्यात वाहनांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त दिसत असल्याने पोलीस ठाणे वाहनतळे झाली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी पकडलेल्या वाहनांवर झालेल्या कारवाईनंतर प्रशासनाला मोठा महसूल मिळणार आहे हेही तेवढेच खरे.