अकोला : जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील शेतात तसेच गोदामातील धान्यसाठा चोरून नेणाऱ्या 12 अट्टल चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आज (मंगळवार) यश आले आहे. हे सर्व चोरटे बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील एका धान्य गोदामातून ११५ क्विंटल तूर, १२७ क्विंटल हरभरा, २२ क्विंटल सोयाबीनसह अन्य मुद्देमाल चोरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
विठ्ठल पंजाबराव मेहेंगे, विश्वनाथ चौके, पंजाबराव बघे, निलेश प्रकाश बघे, आकाश बिलेवार, श्याम भीमराव सरीसे, श्रीधर पठाण, निवृत्ती घटे, गजानन कोठारे, ज्ञानदेव बघे, श्रीकृष्ण करांगळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या टोळीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यांनी जिल्ह्यात सहा घटना केल्याचे कबूल केले आहे. तसेच दुसऱ्या जिल्ह्यात केलेल्या गुन्ह्याची कबुलीही त्यांनी दिली असल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख शैलेष सपकाळ पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे, सागर हटवार, दत्तात्रय ढोरे, संदीप काटकर, शक्ती कांबळे, किशोर सोनोने, मनोज नागमते, संदीप ताले, गीताबाई अवचार यांच्यासह आदींनी ही कारवाई केली आहे.