अकोला - केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधामध्ये कॉंग्रेसने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनामध्ये कृषी कायद्याच्या मसुद्याची होळी करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
काँग्रेसची मागणी -
दरम्यान, केंद्र सरकार हे देशात इंधन वाढ करून महागाई वाढवीत असल्याचा आरोप या वेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी. तसेच सामान्य नागरिकांना महागाईच्या कचाट्यातून सुटका द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासोबतच केंद्र सरकारने तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करुन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला समर्थन द्यावे, अशी मागणीही या माध्यमातून करण्यात आली.
हेही वाचा - वयोवृद्ध कैद्यांच्या सुटकेसाठी मेधा पाटकर यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करून या कृषी कायद्याच्या मसुद्याची होळी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, शहराध्यक्ष बबनराव चौधरी, माजीमंत्री अझहर हुसेन, कपिल रावदेव, महेंद्र गवई, युसुफ भाई, प्रशांत प्रधान यांच्यासह आदींच्या उपस्थित होते.