अकोला - अकोल्यात गेल्या चार महिन्यांपासून दर रविवारी सायकल वारी सुरू झाली आहे. दोनचार जणांच्या सोबतीने सुरू झालेल्या या 'रविवारची सायकल वारीला' व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. दर रविवारी वेगवेगळी थीम आणि ऊर्जा घेऊन शहराच्या वीस ते तीस किलोमीटरपर्यंत जाऊन हे सायकल स्वार आठवड्यातील थकवा दूर करत आहेत. शरीराला व्यायाम मिळावा तसेच पर्यावरण संतुलनात आपला सहभाग असावा, या उद्देशाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शहर उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन कदम यांनी दर रविवारी सायकल चालवण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या छोट्या ग्रुपला अवघ्या चार महिन्यांत शेकडो सायकलस्वार जोडले गेले.
सुरक्षित सायकल स्वारी
दर रविवारी सायकल ग्रुप पहाटे सहा वाजता एकत्र येऊन निर्धारित ठिकाणाकडे सायकलने कूच करतात. सुरक्षितरित्या आणि संयमाने सायकल चालवून सायकलस्वार निर्धारित स्थानावर अवघ्या एक ते सव्वा तासांमध्ये पोहोचतात. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात त्यांच्यामध्ये सोबत असलेल्या एकाही सायकलला कुठलीही इजा झाली नाही.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक निकाल : जल्लोष केल्यास होणार कारवाई