अकोला - जिल्ह्यातील एएनएम वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी आज विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. विशेष म्हणजे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहत आंदोलन केले. त्यामुळे शासनाविरोधात आंदोलन करतानाही आपले कर्तव्य पार पाडण्याचा आदर्श या कर्मचाऱ्यांनी उभा केला आहे.
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे, अशा काळात वैद्यकीय आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह हे एएनएम वर्कर्स आणि गटप्रवर्कतकही आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी सामना करत आहेत. मात्र, या कामगारांच्या सुरक्षेची, त्यांच्या पोटाची जबाबदारीही सरकार घ्यायला तयार नाही, अशी खंत या कामगारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच, आज जिल्ह्यातील सुमारे ६०० आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी आज सरकारविरोधी आंदोलन केले. मात्र, यावेळी त्यांनी काम बंद न ठेवता कामावर हजर राहत हे आंदोलन केले.
कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी प्रतिदिन शंभर रुपये वेतन द्यावे, आणि या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटही देण्यात यावे या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. यासोबतच, स्थलांतरीत कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा, तसेच प्राप्तीकर लागू नसणाऱ्या कुटुंबांना साडेसात हजार रोख रक्कम हस्तांतरित करा अशाही या वर्कर्सच्या मागण्या होत्या. यावेळी या कामगारांनी 'भाषण नको, रेशन द्या' अशी घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला.