अकोला - शहरामध्ये नव्याने 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 3 रुग्ण हे सिंधी कॅम्प मधील रुग्णाचे नातेवाईक असून 2 रुग्ण हे सिंधी कॅम्प येथील रुग्णाच्या दुकानात काम करणारे आहेत. ते कृषीनगरस्थित न्यू भीमनगर येथील रहिवाशी असून हा भाग कंटेन्मेट झोन म्हणून प्रशासनाव्दारे सील करण्यात आला आहे. या परिसरामध्ये जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक किंवा प्रतिष्ठाने सील करण्याची कारवाई मनपा प्रशासनाकडून करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे.
मनपा आयुक्त संजय कापडणीस, पोलीस अधीक्षक अमोघ गांवकर व उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी कंटेन्मेट झोनची पाहणी केली असून या भागातील राहणाऱ्या नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आत जाता येणार नाही. तसेच कंटेन्मेट भागाच्या आत राहणाऱ्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू जसे मेडीकल, भाजीपाला, किराणा व दूध याचा तुटवडा होऊ नये, यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पूर्व झोन कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या. तसेच या भागात निर्जंतूक करण्यासाठी फवारणी करण्याची तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यासाठी एकूण 15 जणांचे पथक करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून दररोज सर्व्हेक्षणचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त यांनी यावेळी सांगितले.
तसेच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी मनपाकडून सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना मदत करण्याचे तसेच सर्दी, ताप, खोकला व घसादुखी असलेल्या नागरिकांबाबतची माहिती देउन सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले. तसेच याबाबत कोणतीही माहिती किंवा जीवनावश्यक वस्तू विषयक तक्रार असल्यास त्यांनी मनपाच्या निशुल्क क्रमांक व हेल्पलाईन नंबर 18002335733, 0724-2434412, 0724-2423290, 0724-2434414, 0724-2430084 या नंबरांवर कळवावे, असे आवाहन केले आहे.