अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कर्करोगाच्या वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने रुग्णालय प्रशासन खळबळून जागे झाले आहे. याबाबत नातेवाईकांना माहिती देण्यात आली असून प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. प्रकाश इंगोले, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - अकोल्यातील मेडिकलचा मदतीचा हात; ना नफा, ना तोट्यात विकत आहे रेमडेसिवीर इंजेक्शन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसांपूर्वी प्रकाश इंगोले हे उपचारासाठी वॉर्ड क्रमांक दहामध्ये दाखल झाले. त्यांना कर्करोग होता. चौथ्या श्रेणीत असलेल्या रोगावर जीएमसीमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या गळ्यात नळी टाकलेली होती, तसेच त्यांना सलाईन लावण्यात आलेली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी दुपारी तोंडावर चादर घेतली, तसेच सलाईनची नळी त्यांनी गळ्याला आवरून घट्ट ओढून गाठ बांधली होती. त्यांच्या गळ्यात टाकलेली नळी ही उघडीच होती. थोड्यावेळाने त्यांचा मृत्यू झाला.
आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, त्यांच्यावर नागपूर येथील कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घरी परत पाठविले होते. त्यानंतर त्यांनी मूर्तिजापूर येथे उपचार घेतले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. परंतु, त्यांची प्रकृती सुधारण्यासारखी नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता जीएमसी प्रशासन पुढील कारवाई करीत आहे.
हेही वाचा - अकोला : संचारबंदी विरोधात व्यापारी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन