अकोला - अनेक नागरिकांचे जीव घेणाऱ्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यात शनिवार (ता. १६) पासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात येईल. त्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘कोविशिल्ड’ लस मिळाली आहे. ही लस सर्वात आधी जिल्ह्यातील ८९८० फ्रंट लाईन वर्कर्सला देण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे.
बहुप्रतिक्षीत लसीकरण मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासनाच्या महत्वाकांक्षी कोरोना लसीकरण मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले की, १६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील स्त्री रूग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आर्बिट हॉस्पीटल येथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना टप्प्या-टप्प्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येईल. सकाळी ९ ते ११ या वेळेत पहिल्या टप्प्यात व त्यानंतर टप्प्यांमध्ये २५-२५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तीला ३० मिनीटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल व त्याला एक महिन्यानंतर पुन्हा लसीचा दुसरा डोस देण्यात येईल. सुरुवातीला एका केंद्रावर १०० जणांचे लसीकरण करण्यात येणार असून एका दिवसात ३०० लोकांना लस देण्यात येईल. त्यापुढील नियोजन वेळोवेळी येणाऱ्या सूचनेप्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. मनीष शर्मा व इतरांची उपस्थिती होती.
०.५ मिलीचा एक डोस
लस देण्यासाठीची निर्जंतूक सिरींज एकदा वापरल्यानंतर ती निकामी होईल. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नवीनच सिरींज वापरावी लागेल. याव्यतिरिक्त लसीच्या एका व्हायलमध्ये १० डोस देता येतील. त्याचे प्रमाण ०.५ मिली असेल. लस घेतल्यानंतर रिअॅक्शन झाल्यास त्याला अॅड्रीनलीनचे इंजेक्शन देण्यात येईल, अशी माहिती डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. लस घेतल्यानंतर व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढेल, असे डॉ. राजकुमार चव्हाण यावेळी म्हणाले. -------------
पहिला डोस मोफत
कोरोनाची लस पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी वैद्यकीय संस्थांमधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर पोलीस दल, लष्कर, महसूल कर्मचारी, तुरूंग विभाग, नगर पालिका, महापालिका कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. यापुढील टप्प्यांमध्ये ५० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येईल. गर्भवती महिला व १८ वर्षाखाली व्यक्तीला तूर्तास लस देण्यात येणार नाही. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लस मोफत दिली जाईल. नंतरच्या टप्प्याबाबत शासन निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली.