अकोला - जिल्ह्यात आज आठही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आज अखेर एकूण ४६९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४५१ अहवाल आले आहेत. एकूण ४३५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले असून १८ अहवाल प्रलंबित आहेत. कोरोना संदर्भात विभागीय आयुक्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी व इतर विभागाचे अधिकारी सामाजिक अंतर ठेवून बैठकीला उपस्थित होते.
![435-corona-reports-negative-in-akola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-04-corona-report-7205458_22042020185022_2204f_1587561622_984.jpg)
आजपर्यंत एकूण ४६९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३६९, फेरतपासणीचे ७२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ नमुने होते. आज आठ अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. आजपर्यंत एकूण ४५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३५६ तर फेरतपासणीचे ६६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २९ अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ४३५ आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १६ आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ११ जणांचे अहवाल फेरतपासणीत निगेटिव्ह आले असून फेरतपासणीतही पॉझिटिव्ह आलेला तीन वर्षीय बालक व मृत रुग्णाचे मुलगा व मुलगी हे दोघे भावंड असे तिघे जण आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
![435-corona-reports-negative-in-akola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-04-corona-report-7205458_22042020185022_2204f_1587561622_0.jpg)
आज तीन जण नव्याने दाखल झाले. आज अखेर जिल्ह्यात १८ अहवाल प्रलंबित असून त्यात १२ प्राथमिक तर सहा फेरतपासणीचे अहवाल आहेत. सद्यस्थितीत ३४ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात ४९९ जण बाहेरुन आलेले आहेत. त्यापैकी १९२ जण गृह अलगीकरणात तर ११७ जण संस्थात्मक अलगीकरणात असे एकूण ३०९ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. विलगीकरणात आता ३४ जण दाखल आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात ४,११२ जणांची तपासणी झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.