अकोला - ज्याप्रमाणे अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे अकोल्यातील उन्हाचा परा ही चढत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अकोल्याचे तापमान 42 अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे. कालच्या तापमानापेक्षा आजच्या तापमानात दोन अंशाने वाढ झाली आहे. कडक उन्हाचा पारा मे महिन्याऐवजी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अकोलेकरांना जाणवत आहे. त्यामुळे हे दोन महिने अकोलेकरांसाठी आणखीन उष्ण ठरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, बदलीसाठी पैसे घेणारा तो नेता कोण?
अकोला जिल्ह्याच्या तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे. 30 मार्च रोजी हवामान विभागाने हिट वेव्ह असल्याचे भाकीत वर्तविले होते. त्यानंतर मात्र उन्हाची तीव्रता अधिक वाढली. 1 एप्रिल रोजी अकोल्याचे तापमान 41.6 अंश सेल्सिअस वर होते. तर किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस होते. दोन एप्रिल रोजी तापमानात दीड अंशाने घट झाली. परंतु, आजच्या तापमानामध्ये दोन अंशाने वाढ होऊन 42 अंश सेल्सिअस तापमान होते.
डोक्यावर रुमाल आणि तोंडावर मास्क
तापमान वाढत असल्यामुळे अकोलेकरांची थंड पेय, उसाचा रस, आईस्क्रीम, शरबत पिण्याकडे ओढ लागली आहे. रस्त्यावरील चहाची दुकाने आता गजबजलेली दिसत नाहीत. रस्त्यांवरील दुपारची वाहतूकही विरळ झाली आहे. डोक्यावर रुमाल आणि तोंडावर मास्क, असा वेश अकोलेकरांचे दिसत आहे.
मे महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता -
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अकोल्याच्या तापमानामध्ये कमालीची वाढ झाल्याने मे महिन्यात हे तापमान यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, हवामान विभागाकडून उन्हापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे नागरिकांच्या जिवाला धोका होणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करत आहे - जयंत पाटील