अकोला - कोरोना संसर्ग तपासणीचे ३१ अहवाल गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचे प्राप्त झाले. त्यातील ३० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, बैदपूरा येथील फतेह चौक भागातील एका ६१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, बैदपूरा येथील ३ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर गुरुवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे.
सद्यस्थितीत २८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सातजण त्यानंतर सोमवारी एका जणास व गुरुवारी आणि तिघांना असे एकंदरीत ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर, १४ जण उपचार घेत आहेत. दरम्यान, ज्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तो ६० वर्षीय व्यक्ती असून तोदेखील बैदपूरा भागातील फतेह चौक येथील रहिवासी आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.
तसेच आणखी ३ रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. हे तिघे रुग्ण बैदपूऱ्यातील असून त्यातील एक रुग्ण हा जिल्ह्यातील पहिला रुग्ण ठरला होता. हा रुग्ण ६० वर्षे वयाचा असून ५ एप्रिल रोजी उपचारार्थ दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. या दरम्यान, त्याच्या सहा वेळा चाचण्या करण्यात आल्या. त्यातील चौथा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतरचे दोनही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर त्यात एका ७५ वर्षीय वृद्धेचा व एका पाच वर्षीय बालिकेचा समावेश आहे. या दोघीही पहिल्या रुग्णाच्या संपर्कातून ७ एप्रिल रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांच्याही सहा चाचण्या करण्यात आल्या. त्या दोघींचाही चवथा अहवाल पॉझिटिव्ह आला नंतर पुन्हा पाचवा व सहावा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. या रुग्णांना डिस्चार्ज देतेवेळी स्वतः पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, समवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार यांच्यासह उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित होते.