अकोला - जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळपर्यंत 22 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर सायंकाळपर्यंत आणखी 4 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने दिवसभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 26 झाली आहे. तसेच दिवसभरात 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सायंकाळी प्राप्त अहवालापैकी जे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यात दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. हरिहरपेठ, दगडीपुल, तारफैल आणि अकोट येथील ते रहिवासी आहेत.
हेही वाचा... CORONA UPDATE : राज्यात 5,257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, एका दिवसात १८१ मृत्यू
आज दिवसभरात ज्या 18 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला, त्यातील आठ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी सोडण्यात आले. त्यातील दोघे सिंधी कॅम्प, दोण जण अकोट फैल येथील तर उर्वरित हरिहरपेठ, गुलजारपुरा, जुने शहर आणि तारफैल येथील रहिवासी आहेत. तर दहा जणांना कोविड केअर सेंटर मधून घरी सोडण्यात आले. त्यात तिघे सिंधी कॅम्प, दोघे शंकर नगर, दोघे अकोट फैल, बैदपुरा, लाडिज फैल, गायत्री नगर येथील रहिवासी आहेत.
प्राप्त अहवालानुसार अकोला जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती :
प्राप्त अहवाल - 357
पॉझिटीव्ह अहवाल - 26
निगेटीव्ह - 331
एकूण पॉझिटीव्ह अहवाल - 1536
कोरोनाबाधित मृत संख्या - 77 (76+1)
डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1093
रुग्णालयात दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह रुग्ण ) - 366
हेही वाचा... टिक-टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर देशात बंदी!
राज्यातील कोरोनाची स्थिती...
राज्यात सलग चौथ्या दिवशी पाच हजारांच्यावर कोरोना रुग्ण आढळले आहेत. सोमवारी राज्यात कोरोनाच्या 5257 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 73 हजार 298 रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज (सोमवार) 2385 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण संख्या 88 हजार 960 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.37 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 9 लाख 43 हजार 485 नमुन्यांपैकी 1 लाख 69 हजार 883 नमुने पॉझिटिव्ह (18 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 74 हजार 93 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 758 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज (सोमवार) 181 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी 78 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 103 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.48 टक्के एवढा आहे.
राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन...
राज्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे. अनलॉक-1 प्रमाणेच अनलॉक-2 मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेले लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असेही सांगितले. त्यानुसार आज (सोमवार) मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या सहीने अधिसूचना जारी करण्यात आली असून लॉकडाऊन आणि निर्बंध कायम ठेवत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.