अकोला - शेतातील पिकांना पाणी देताना विजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील वाडेगाव-देगाव शिवारात घडली. शेख आसिफ शेख शब्बीर आणि शेख महेमुद शेख रशिद अशी मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - लासलगावातील महिला जळीत प्रकरण; प्रेमसंबधांतून घडली घटना, 2 संशयित ताब्यात
ही दोघे रविवारी सकाळी आपल्या शेतात हरभरा आणि गहु पिकांना पाणी देत होते. विहिरीतून पंपाद्वारे पाणी देत असताना या दोघांना विजेचा झटका झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर शेख आरीफ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृतदेह अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.