अकोला - कोरोना चाचणीचे 63 अहवाल रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाले. त्यापैकी रविवारी सकाळी 12 आणि सायंकाळी 3, असे एकूण 15 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दोन मृत महिलांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५ वर पोहोचली असून प्रत्यक्षात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
रविवारी एकूण ६३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४८ अहवाल निगेटिव्ह आले असून १५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत ५५ जण उपचार घेत असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या १ आणि २ मे रोजी दोन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यांचे चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
एकाच दिवशी १५ पॉझिटिव्ह -
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा 12 जण, तर सायंकाळी सहा वाजता प्राप्त अहवालात तीन जण, असे दिवसभरात 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 रुग्णांपैकी दोन महिलांचा 1 व 2 मे रोजी मृत्यू झाला आहे, तर उर्वरीत दहा जणांपैकी तीन मोमीनपुरा, पाच जण बैदपुरा, तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत. सायंकाळी प्राप्त अहवालात तीन पॉझिटीव्ह रुग्ण असून त्या तिन्ही महिला आहेत. त्यात एक महिला ही न्यू भिमनगर येथील, तर अन्य दोन्ही महिला या बैदपुरा येथील रहिवासी आहेत.
दोघांना डिस्चार्ज -
बैदपुरा येथील दोघे पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देऊन त्यांना घरी सोडण्यात आले. ही दोन्ही भावंडे असून या आधी मृत्यू झालेल्या रुग्णाची अपत्य आहेत. त्यांना रविवारी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सने टाळ्या वाजवून निरोप दिला.