शिर्डी - क्रिकेट खेळताना चेष्टा मस्करीतून झालेला वाद थेट कोयत्याने मारहाण करेपर्यंत गेल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीत घडला आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साईदीप कुऱहाडे, असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिर्डीतील गोळीबाराची घटना ताजी असताना हा गंभीर प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शिर्डीतील गोंदकर मैदानावर काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी साईदीप दिपेश कुऱहाडे आणि शुभम राजु घोडे या तरुणांमध्ये वाद झाला. शिवीगाळ झाल्यानंतर शुभम मैदानावरून निघून गेला आणि काही वेळानंतर कोयता घेऊन साईदीपवर त्याने पाठीमागून वार केला.
कोयत्याने वार केल्याने साईदीप गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेनंतर शुभम पसार झाला आहे. क्रिकेट खेळताना केवळ किरकोळ वादातून मारहाणीची ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.