अहमदनगर - '56 इंचाची छाती चीनला घाबरते', अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यान होणारी ही शांती यात्रा शुक्रवारी संगमनेर येथे आली. या वेळी आयोजित केलेल्या मेळाव्यात सिन्हा यांनी मोदींच्या धोरणावर जोरदार टीका केली.
'नागरिकत्व सुधारणा कायद्याची या देशात गरज नाही. मात्र, देशातील आर्थिक डबघाई लपवण्यासाठी केंद्र सरकारने हा कायदा आणून लोकांचे लक्ष विचलित करण्यात यश मिळवले. या शांतता यात्रेद्वारे तीन हजार किलोमीटरचा प्रवास करुन देशातील लोकांना हीच बाब समजून सांगत आहोत,' असे सिन्हा म्हणाले. '56 इंचाची छाती चीनला घाबरते. तिबेटमधून बौद्ध धर्मीय भारतात आले तर, त्यांना भारताचे नागरिकत्व देतो, असे म्हणण्याची यांची हिंमत नाही', अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा- भाजपचे सर्व भ्रष्टाचार हळूहळू बाहेर काढणार..'
मोदी-शाह अर्थमंत्री असलेल्या सीतारामन यांना बाजूला ठेवून लोकांची मते जाणून घेत आहेत. अर्थमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला डावलले जात आहे. राजीनामा देण्याचे सोडून सीतारामन त्या खुर्चीला चिकटून आहे, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला.
वेगळ्या विचारधारेमुळे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या झाल्या. ज्या विचारसरणीचा मुकाबला करू शकत नाही, तो विचारच संपवून टाकायचा ही राष्ट्रीय स्वयंसेवी संघ आणि सनातनी संघटनांची भूमिका आहे. या संघटनांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाणांनी केली.