अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील चोवीस वर्षीय अनुसूचित जातीतील तरुणीने आपल्यावर वारंवार अत्याचार झाल्याची आणि तक्रार देऊ नये म्हणून मारहाण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिसांनी या प्रकरणी एकूण ७ आरोपींविरोधात बलात्कार, क्रूर छळ, मारहाण यासह दलित अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये राजकीय क्षेत्रातील बडे प्रस्थ असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला सरपंचासह बाजार समितीच्या एका संचालकाचा समावेश आहे. तक्रारीत तरुणीने मुख्य आरोपी लखन कुमार काकडे याने धमकावून प्रेम असल्याचे आणि लग्न करू असे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपीने लग्नास नकार देत मारहाण केली, विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपींनी पोलिसांत तक्रार देऊ नये म्हणून दबाव आणून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आपल्या जीवाला आरोपींकडून धोका असल्याने आपणास पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी पीडित तरुणीने दिली आहे. श्रीगोंदा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.