शिर्डी (अहमदनगर) - राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील ३० वर्षीय महिला प्रसुतीसाठी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत राहुरी (Rahuri) तालुक्यातील देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयात (Deolali Pravara Rural Hospital) आली होती. मात्र, तिला रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने ती दुसऱ्या रुग्णालयत जात होती. त्यावेळी तिची रस्त्यातच प्रसुती झाली (Woman Delivers On Road). कोमल शिंदे असे त्या महिलेचे नाव आहे. या सर्व प्रकारामुळे सरकारी रुग्णालयांचा अनागोंदी कारभाराचा फटका गरीब रुग्णांना बसत असल्याचे चित्र आहे.
- देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रातला प्रकार -
देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत सातत्याने तक्रारी होत असतात. आज सकाळी ६ वाजता प्रसुतीसाठी एक महिला रुग्णालयात आली होती. या महिलेला देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेने तपासणी करुन दोन दिवस बाकी असल्याने नंतर येण्यास सांगितले. या महिलेचे कुटुंब गरीब असल्याने ती महिला पायीच दुसऱया रुग्णालयात निघाली. जात असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या 300 फूट अंतरावर या महिलेची प्रसुती रस्त्यावरच झाली. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची हेळसांड करण्याऱ्या वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ, परिचारिका यांचे त्वरित निलंबन करण्याची मागणी सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.
हेही वाचा - रायगडमध्ये महिलेने धावत्या एसटी बसमध्ये दिला बाळाला जन्म
- महिलेची रस्त्यातच प्रसुती -
रुग्णालयापासुन अवघ्या 300 फुटावर नगरपालिका कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पोलीस मैदानाजवळील रस्त्यावर महिलेची प्रसुती झाली. त्यावेळी आजूबाजूच्या महिला मदतीसाठी धावल्या. या महिलेस नगरपालिकेच्या भिंतीजवळ नेऊन साड्यांचा आडोसा तयार करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेस बोलावून नवजात बालकाची नाळ कापण्यात आली. त्यानंतर सदर परिचारिकेच्या झालेली चूक लक्षात आल्याने परिचारिका व संबंधित महिलांनी तिला आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
- महिलेच्या पतीने रुग्णालयाकडे केल्या विनवण्या -
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी तिच्या प्रसुतीची तारीख १५ फेब्रुवारी २०२२ असल्याचे रिपोर्टमध्ये दाखवले. त्यामुळे तिच्या प्रसुतीस एक महिना कालावधी असल्याने तिला घरी जाण्यास सांगितले होते. ज्यावेळी ती प्राथमिक केंद्रात आली त्यावेळी तिला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नसल्याचे प्राथमिक केंद्रातील परिचारिकेने सांगितले. परंतु कोमलचे पती अरुण शिंदे यांनी तिला पोटात वेदना होत आहे. माझी मोठ्या रुग्णालयात जायची परिस्थिती नाही. तिला येथेच प्रसुतीसाठी दाखल करून घ्यावे अशी विनवणी केली. मात्र, कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी अरुण शिंदे यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या महिलेस बाहेर काढून दिले. त्यानंतर अवघ्या ३०० फुटावर जाऊन त्या महिलेची प्रसुती झाली. तिला गोंडस मुलगी झाली आहे. बाळ व बाळाची आईची प्रकृती चांगली आहे. मात्र यामुळे आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा - नागपूरच्या डागा रुग्णालयाच्या व्हरांड्यात महिलेची प्रसूती, भरती न करून घेतल्याने बाळ दगावल्याचा आरोप