अहमदनगर - कर्जत तालुक्यातील शिंदे या गावामध्ये शेतकरी महिला घराच्या बाहेर धुतलेले कपडे वाळण्यासाठी टाकत होती. त्यावेळी तिच्या अंगावर महावितरणची मुख्य वीजवाहक तार अचानक तुटून पडली. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सुरेखा अनिल ननवरे असे त्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - मंत्रिमंडळात खांदेपालट.. जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या खात्यांची अदलाबदली
या घटनेमुळे शिंदे गावाच्या परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या बेजबाबदार कारभारावर संताप व्यक्त होत आहे. या घटनेत त्याठिकाणी असलेल्या कुत्र्याच्या अंगावरही तार पडून त्या कुत्र्याचा देखील मृत्यू झाला.
सुरेखा अनिल ननवरे यांनी शेतात जाण्यापूर्वी घरातील सर्व कपडे धुऊन ते घराच्या अंगणामध्ये असलेल्या दोरीवर वाळत टाकत होत्या. यावेळी अचानक वरून गेलेली वीजवाहक तार तुटली व ती अंगावर पडली. यामध्ये विजेचा प्रवाह सुरू असल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी घरामध्ये असलेल्या त्यांच्या मुलीने हा सर्व प्रकार पाहिला व तिने जोरात आरडाओरड केला. तेव्हा शेजारील शेतामध्ये काम करत असलेले त्या महिलेचे पती अनिल हे पळत आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता व सुरेखा यांचा यात मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
या घटनेसाठी महावितरण जबाबदार असून यापूर्वी देखील ही वीजवाहक तार तुटली होती. वारंवार या तारा चांगल्या बसवाव्यात अशी मागणी केली. परंतु, याकडे महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.