अहमदनगर- पाणी हा आता स्थानिक प्रश्न नसून जागतिक प्रश्न आहे. तो सोडवण्याची जबाबदारी गाव ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे, असे वक्तव्य आजच्या 'जल दिनी' आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच आणि शासनाच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. पाण्यासारख्या विषयाचा जागतिक दिन साजरा करावा लागतो, याचीच मोठी खंत असल्याचेही ते म्हणाले.
नियोजन केल्याशिवाय ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही-
उपलब्ध पाण्याचा ताळेबंद न मांडता वारेमाप पाण्याचा वापर करून शेती करणे आता परवडणारे नाही. त्यासाठी शेतीचे नियोजन गाव पातळीवर झालेच पाहिजे. अन्यथा पावसाळ्यात सुद्धा पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ दूर नाही. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेतीचे नियोजन झाले पाहिजे. पाण्याची परस्थिती पाहून ठराविक काळात शेती बंद ठेवली पाहिजे, हे सांगताना त्यांनी आदर्श गाव हिवरेबाजारचे उदाहरण दिले. सध्या संपूर्ण गाव शिवारात शेती बंद आहे. पाण्याचे आणि शेतीचे नियोजन केल्याने विहिरींना मुबलक पाणी आहे. त्यामुळे शासनाच्या टँकरची आणि पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर नसल्याचे पोपटराव पवार यांनी आवर्जून सांगितले.
अन्यथा गावा-गावात संघर्ष अटळ-
पाण्याचा वारेमाप वापर केल्याने ऐन उन्हाळ्यात आणि नंतर पावसाने ओढ दिल्यावर प्रत्येक गावात, तालुक्यात आणि पुढे विभाग पातळीवर पाण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. निसर्गाने दिलेले पाणी कुणाचे या प्रश्नाऐवजी पाणी जपून वापरण्यासाठी त्याचे नियोजन करण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च केल्यास पाण्यासाठी निर्माण होत असलेला संघर्ष टाळता येईल.
जलयुक्त शिवारसारख्या शासनाच्या योजना आहेत. सरकार त्यासाठी निधी, यंत्रणा, मनुष्यबळ देत असले तरी गावाची उदासीनता असेल तर अशा योजना फक्त ठेकेदारांसाठी राहतात आणि पाणीप्रश्न आहे, तसेच राहतात, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.