अहमदनगर - शेवगाव तालुक्याचा रविवारचा आठवडे बाजार आज सकाळी नेहमीप्रमाणे भरण्यास सुरुवात झाली होती. मात्र, अचानक जागा मालक सरोज इनामदार यांनी बाजारासाठी आलेले शेतकरी व व्यापाऱ्यांना बाजारासाठी बसण्यास मनाई केली. त्यांनी बाजाराच्या प्रवेश द्वाराजवळ आपले चारचाकी वाहन आडवे लावून रस्ता बंद केला.
इनामदार यांनी आपली मोकळी जागा नगरपालिकेला आठवडे बाजारासाठी भाडे कराराने दिली होती. मात्र, करार संपल्यानंतर पालिकेने इनामदार यांच्याशी नवीन करार केला नाही. वारंवार इनामदार पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही नवीन करार होत नसल्याने त्यांनी आज चिडून बाजार भरवण्यास शेतकरी-विक्रेत्यांना मनाई केली. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी एकच गोंधळ घालत रास्ता रोको करून आंदोलन सूरु केले.
यावेळी शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्यारेलाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव- नेवासा या राजमार्गावर ठिय्या देऊन घोषणाबाजी सुरू केली. या वेळी तत्काळ बाजार सुरू करावा, अशी मागणी केली. त्यानंतर शेवगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण विनोद मोहिते, शेवगाव नगर परिषदेचे कक्ष अधिकारी राजू इंगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगडे, दादा पाचरणे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अधिकारी व शेतकरी, व्यापारी यांची मध्यस्थी करून एक तासानंतर हा बाजार परत त्याच जागेवर भरण्यास सुरुवात केली. सुमारे एक तास चालू असलेल्या या गोंधळामुळे शेवगावमध्ये एकच खळबळ उडाली.