अहमदनगर - नाशिक धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या पुराचे पाणी कोपरगाव शहरातील विविध भागात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
गोदावरीकाठी असलेल्या कोपरगाव शहरातील खंदकनाला, सप्तश्रीमळा, आयेशा कॉलनी, सुभाष नगर, राघोबादादा वाडा, निंबारा मैदान, हनुमाननगर, गजानन नगर आणि रेव्हेन्यू कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात तसेच दुकानांत पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सध्याच्या पूर परिस्थितीमुळे प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.
पूर परिस्थिती बघता प्रशासनाच्या तसेच संजीवनी आणि काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मदत कार्य सुरू आहे. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात पाणी पोहोचल्याने, दुकानदारांनी आपली दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. पुराचे पाणी रात्री वाढत गेल्याने नागरिकांनी भितीने रात्र जागून काढली. पूर परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने कोपरगावसह इतर नदीकाठच्या तालुक्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग कमी केल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.