अहमदनगर - कर्जत-जामखेड तालुक्यातील कुकडी डावा कालवा व चिंचणी (घोड) धरण कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. या गावांना पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
रोहित पवार यांनी पुण्यातील सिंचन भवनात महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्या सोबत बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर ८ दिवसात पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन अन्सारी यांनी दिले होते. त्यानुसार काही भागात पाणी सोडण्यास सुरवात झाली.
दुसरीकडे भोसे खिंड बोगद्यातूनही पुरेशा दाबाने पाणी सोडले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या पाण्यामुळे २ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. लाभक्षेत्रातील इतर गावांबरोबरच जामखेड तालुक्यातील जवळा, अघी, चौंडी तसेच कर्जत तालुक्यातील दिघी, चापडगाव, निमगाव डाकू या शेवटच्या भागातील गावापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहचण्याची कार्यवाही करण्याची मागणीही राहित पवार यांनी केली.