शिर्डी (अहमदनगर) - कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर कोविड नियमांच्या आधीन राहून 16 नोहेंबरपासून शिर्डीचे साई बाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र शिर्डी ग्रामस्थांना पूर्वी प्रमाणे सहज साई दर्शनासाठी जाता येत नाहीये तर दुसरीकडे मंदिर परीसरातील गेट नंबर 3 आणि 4 भक्तांसाठी खुले नसल्याने स्थानिक व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेत येत्या 29 तारखेपर्यंत साई संस्थानने निर्णय न घेतल्यास शिर्डी बंद ठेवण्याची तयारी केलीय तर दुसरीकडे साई संस्थाने आता एक पाऊल पुढे येत शिर्डी ग्रामस्थांशी चर्चा करत मार्ग काढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
शिर्डीच साई मंदिर गेल्या 16 नोहेंबरला भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दिवसेंदिवस भक्तांची गर्दी शिर्डीत वाढतेय. मंदिराच्या बाहेर कोविडचे सगळे नियम पायदळी तुडविले जाताहेत. मंदिरात मात्र सध्या भक्तांना सुखदायक दर्शन मिळतंय दुसरीकडे ग्रामस्थांना पूर्वीप्रमाणे सहजासहजी दर्शनाला जाता येत नाही. ग्रामस्थांना साई दर्शनासाठी सकाळीचे काही तासच देण्यात आले आहे. त्यात साई संस्थानने भक्तांना केवळ गेट नंबर एकने प्रवेश देत त्यांना नगर-मनमाड रोडकडील गेडनंबर पाचकडून बाहेर निघण्याची व्यवस्था केली आहे. साई मंदिराच्या गेट नंबर 2, 3 आणि 4 कडील बाजुला बहुतांशी दुकाने असल्याने आणि या गेटमधून भक्त बाहेर पडत नसल्याने स्थानिक व्यवसायवर परिणाम होत आहे. त्यामुळे साई संस्थानकडेही प्रवेश द्वारे उघडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र अद्याप ही द्वारे उघडली गेली नाहीत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी येत्या दोन दिवसात त्यांच्या मागण्यांवर विचार न केल्यास गाव बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांनीच काही उपाय सुचवावेत -
साई मंदिर सुरु झाल्यानंतर कोविडचे नियम पाळत भक्तांना दर्शन दिल जातंय. कोविड नियमानुसार धार्मिक स्थळी येणाऱ्या भक्तांची जाण्या-येण्याचे मार्ग कमी असावेत असे आदेश आहेत. त्यामुळे सध्या भक्तांना आणि ग्रामस्थांनाही काही अडचणी येत आहेत. मात्र साई संस्थान आता ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेवुन त्यांचाशी चर्चा करण्यास तयार असुन गेट उघडण्याबाबत सकारात्मक निर्णयासाठी ग्रामस्थांनीच आता उपाय सुचवावेत, असे साई संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या नियमात शिथीलता मिळाल्यानंतर साई मंदिर उघडण्यात आले, मात्र साईभक्त, ग्रामस्थ आणि पत्रकार या सर्वांना नियमांच्या जोख़डात अडकवून त्याच दर्शन आणि नित्याचं कामकाज सुलभ होण्याएवजी त्यात आडकाठी ठरत आहे. या सगळ्या गदारोळात आता साई संस्थाने सामंजस्याची भुमिका घेण्याची तयारी दर्शविल्याने ग्रामस्थ आणि संस्थानमधील गेल्या अनेक वर्षापासुन अनेक विषयवर सुरु असलेला वाद काही दिवसात शमेल असं दिसतेय.