शिर्डी - श्री साईबाबा संस्थान हे भारतातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून गणले जाते. मात्र साईबाबांच्या मंदिरात सुरक्षेसाठी सीआयएसएफ अथवा एमएसएफ सुरक्षा व्यवस्था लागू करण्याबाबत संस्थानच्या प्रयत्न केले जात आहेत. याबाबत संस्थानच्या वतीने ग्रामस्थांचे मत जाणून घेण्यात आले. मात्र या सुरक्षा व्यवस्थेला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या आशयाचे निवेदन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानची सुरक्षा व्यवस्था पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे.
सीआयएसएफ अथवा एमएसएफ सुरक्षा होणार लागू उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात श्री साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफ अथवा एमएसएफ सुरक्षा व्यवस्था लागू करण्याबाबतचा मुद्दा विचारात आहे. त्यासंदर्भात श्री साईबाबा संस्थान विश्वस्त ( CISF Security For Sai baba Temple ) व्यवस्था शिर्डी, ग्रामस्थ, पत्रकार, सध्याच्या सुरक्षा यंत्रणा व इतर संबंधित यांचे मत जाणून घेण्यासाठी साईमंदिर परिसरातील फलकावर ८ जानेवारीला नोटीस लावली होती. याबाबत कोणास आपले मत मांडायचे असल्यास त्यांनी लेंडीबागे जवळील साई सभागृहाजवळ उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आली होती. त्यास अनुसरून शिर्डी ग्रामस्थांनी बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर सीआयएसएफ अथवा एमएसएफ ही सुरक्षा व्यवस्था लागू करण्याबाबत नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
साईभक्तांकडे संशयास्पद भुमिकेतून पाहण्याची भीती सिआयएसएफ अथवा एमएसएफ या सुरक्षा यंत्रणा येणाऱ्या प्रत्येक साईभक्ताकडे व ग्रामस्थांकडे संशयास्पद बघेल. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांच्या व साईभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. सीआयएसएफ अथवा एमएसएफच्या कठोर अमलबजावणीमुळे रोज वादावादी होऊन अशांतता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. साईमंदिर हे धार्मिक क्षेत्र आहे, इथे श्रद्धेचा कायदा आहे, इथे भावनांना किंमत आहे. त्यामुळे सिआयएसएफ अथवा एमएसएफ ही व्यवस्था साईभक्तांना लागू करणे योग्य नाही. ठराविक याचिकाकर्ते वारंवार याचिका दाखल करतात. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षांपासून विकासावर देखील परिणाम झाला आहे. असुरक्षितता व गुन्हेगारीचा मुद्दा पुढे करून सिआयएसएफ अथवा एमएसएफ नियुक्तीचा घाठ घातला जात आहे. मात्र मंदिर परिसरात आजवर कोणताही मोठा गुन्हा घडलेला नाही. याचा अर्थ आजवरची सुरक्षितता योग्यच आहे. त्यामुळे सिआयएसएफ अथवा एमएसएफ याची अजिबात आवश्यकता नसल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत.
भ्रमनिरास होण्याची शक्यता ज्याप्रकारे आयएएस अधिकाऱ्याच्या नेमणुकीबाबत भ्रमनिरास झाला. तोच सीआयएसएफ अथवा एमएसएफ बाबत देखील होऊ शकतो. सीआयएसएफ अथवा एमएसएफ नेमण्याऐवजी सध्या जी पोलीस यंत्रणा नेमण्यात आलेली आहे, ती पूर्ण संख्येने पुरवण्यात यावी व नवीन कर्मचारी नियुक्त करण्यात यावे. सिआयएसएफ अथवा एमएसएफची नियुक्ती म्हणजे आजारापेक्षा औषध भयंकर अशी परिस्थिती निर्माण होईल. साईबाबा हे सबका मालिक एक याचा संदेश देणारे दैवत आहेत. तसेच बाबांची शिकवण श्रद्धा व सबुरी आहे. या वचनाप्रमाणे साईबाबा मंदिर ( Shri Sai Baba Temple Shirdi ) परिसरात कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटत नाही. त्यामुळे सीआयएसएफ अथवा एमएसएफची गरज नसून या सुरक्षा यंत्रणांची नियुक्ती करू नये, असा ठराव करून साईबाबा संस्थान व्यवस्थापन व प्रशासनाने न्यायालयात सादर करावा, अशी मागणी समस्त शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.