अहमदनगर- जिल्ह्याच्या उत्तर भागात सातत्याने पडलेल्या भिज पावसामुळे शिर्डीसह अनेक ठिकाणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून भाजीपाल्यासह फळभाजांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कोबी, वांगे, भेंडी, टोमेटो या पिकांच्या झाडांना आलेली फुले पावसामुळे गळून पडली आहेत. राहिलेल्या फुलांवर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादन क्षमतेवर परीणाम जाणवू लागला आहे. भाजीपाल्यांच्या उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राहाता तालुक्यातील नादुर्खी येथील मधुकर वाणी यांनी दीड एकर क्षेत्रात वांगी आणि भेंडीची लागवड केली आहे. मात्र, सततच्या पावसामुळे सुरुवातीचे काही दिवस तर भाजीपाला तोडणी करणे अवघड होऊन बसले होते. वांगी आणि भेंडीच्या झाडावरील फुले गळाली तर इतर फुलांना किड लागली आहे. यामुळे उत्पादन कमी झाले आहे. हा भाजीपाला विक्रीसाठी आठ दिवसांपुर्वी विक्रीसाठी नेला असता व्यापाऱ्यांकडून त्याला 5 ते 6 रुपये किलोचा भाव मिळत होता, आता त्यात थोडी वाढ झाली आहे. यावर्षी शेतात पीक घेण्यासाठी केलेल्या खर्चांपैकी 60 टक्के रक्कम परत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे मधुकर वाणी यांनी शेतातील वांगी, भेंडी मोठ्या व्यापाऱ्याला न देता थेट ग्राहकांना विक्री करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वांगे आणि भेंडीला 40 ते 45 रुपये प्रति किलो मिळत आहेत. यामुळे पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च तरी परत मिळेल, अशी आशा वाणी यांना आहे.
पावसामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांना होण्या ऐवजी मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांना होत आहे. भाजीपाला विक्रीसाठी भाजीपाला जास्त अंतरावरुन आणावा लागत असल्याचे, शिर्डीतील भाजी विक्रेते प्रवीण जाधव यांनी सांगितले आहे. भाज्यांचे दर वाढले असल्याने किरकोळ बाजारात भाज्या खरेदी करताना ग्राहकांना आपला खिसा रिकामा करावा लागत आहे. येणाऱ्या काही दिवसात पावसाने परत हजेरी लावली तर भाजीपालाचे दर यापेक्षाही जास्त होणार असल्याचे भाजी विक्रेता प्रवीण जाधव याचे म्हणणे आहे.
किरकोळ बाजारात गेल्या 25 दिवसापूर्वींचा बाजारभाव आणि आजचा बाजारभाव असा आहे....
भाजीपाला | 25 दिवसापूर्वींचा बाजारभाव(₹) | सध्याचा बाजारभाव (₹) |
मेथीची जुडी | 10 ते 15 | 30 |
पत्ता कोबी | 7 ते 8 | 20 |
कारले | 10 ते 15 | 40 |
वांगे | 20 ते 25 | 60 |
पालक-आंबडचुका- शेपू जुडी | 8 ते 10 | 20 |
कोथिंबीर जुडी | 15 ते 20 | 50 |
भेंडी | 20 ते 25 | 50 ते 60 |
फ्लॉवर | 30 ते 40 | 70 ते 80 |
गवार | 35 ते 40 | 70 ते 80 |
घेवडा | 70 ते 80 | 120 |
दोडका | 20 ते 30 | 50 ते 60 |
बटाटा | 15 ते 20 | 40 |
टोमॅटो | 20 | 40 |