शिर्डी (अहमदनगर) - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळांचे बारा वाजले आहेत. लॉकडाऊनकाळात बंद झालेल्या शाळा कोरोनाच्या धास्तीने पुन्हा कधी सुरू करायच्या याबाबत अनिश्चितता आहे. त्यातच आता काही शिक्षण संस्थाच्या पुढाकारातून ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. सरकारकडून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आग्रह धरण्यात येत आहे. तसा शिक्षणमंत्र्यांनी आदेशही काढला आहे. मात्र, प्रत्यक्षात या शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ अकोला, संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यासह पालकांवर आली आहे. त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कित्येक गावात अद्याप मोबाईला नेटवर्कच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जर रेंजच नसेल तर ऑनलाईन शिक्षण घ्यायचे कसे असा सवाल आता विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीचे निकाल अद्याप लागले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने राज्यातील बहुतांशी शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. अशात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला आहे. मात्र, अकोला, संगमनेर तालुक्यातील काही शाळा डोंगराळ भागात आहेत. येथील गावामध्ये दळण वळणाच्या सुविधांचा आजही अभाव आहे. पावसाळ्यात लाईट जाणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाणही मुश्कील होते. अशातच शालेय वर्ष सुरू झाल्याने काही खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. तर काही शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या ऑनलाइन शिक्षणासाठी सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध असेलच असे नाही. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सुमारे दहाच्या वर गावात अद्याप मोबाईलची रेंजच व्यवस्थित मिळत नाही. काहींकडे मोबाईल आहेत मात्र त्याचा वापर जिथे डोंगरावर रेंज मिळेल तिथेच जाऊन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे, अशीच काहीशी परिस्थिती तांगड गावातील आहे.
तांगडवाडीतील अनेक लोक बाहेर नोकरी करतात. त्यांच्याकडे अँड्राईड मोबाईलही आहेत. मात्र त्याच्या गावात मोबाईलला पुरेशी रेंज मिळत नसल्याने त्याचा वापर बाहेर गेल्यावरच करावा लागतो. गावातच मोबाईलला रेंज मिळावी, यासाठी बहुतांशी तांगडकरवासीयांनी प्रशासनाकडे पाठपुरावाही करत आहेत. मात्र, त्याला यश आले नाही. त्यातच आता कोरोनाच्या भीतीने सर्वच लॉकडाऊन झाले असताना ऑनलाइन शिक्षणाचे पेव फुटले आहे. मात्र, तांगडेवाडीत मोबाईला रेंजच मिळत नाही, रेंजसाठी कधी कधी आळेफाटा येथे जावे लागते. अशा परिस्थितीत मग विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे ऑनलाईन धडे कसे गिरवायचे? असा सवाल तांगड गावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुख सुरेखा तांगडकर यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाच्या काळात घरातून ऑनलाइन शिक्षण घेता यावे यासाठी मोबाईला व्यवस्थित रेंज उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गावात रेंज येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. खासगी शाळांकडून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र तांगडेवाडीसारख्या गावातील विद्यार्थ्यांना मोबाईलला रेंज नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी उंच डोंगरावर रानावनात ज्या ठिकाणी रेंज मिळेल, अशा ठिकाणी जावे लागत आहे. मात्र हे नियमित शक्य नाही. यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेंजचा प्रश्न तत्काळ सोडवावा अन्यथा या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण आमच्यासाठी स्वप्नच राहिल, अशी प्रतिक्रिया संजना तांगडकर या विद्यार्थिनीने यावेळी दिली आहे.
या पंचक्रोशीतील वनकुटे, भोजदरी, कोठे बुद्रुक, कोठे खुर्द, तांगडी व अन्य गावे ही रेंजपासुन वचिंत आहेत. वेळ प्रसंगी या पंचक्रोशीतील युवकांनी नेटवर्क मिळावे म्हणून टॉवरवर चढुन आंदोलनेही केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. या ठिकाणी BSNL ची सेवा मिळते ती देखील मोडकळीस आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तसेच रिलायन्स जिओने येथे एक वर्षापूर्वी आपला एक टॉवर उभा केला आहे. तो एक शोभेचा खांब झाला आहे. त्यामुळे ऑफलाइन रेंजमुळे विद्यार्थ्यांच्या नशिबी ऑनलाइन शिक्षण हे फक्त स्वप्नच राहणार का असा प्रश्न येथील नागरिकांमधून आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.