अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. चौथ्या टप्प्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. या मतदारसंघात सकाळीच दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेस आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सपत्नीक श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथ नगर येथे बुथवर आपले पहिले मतदान करून हक्क बजावला. त्याआधी त्यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. सध्या अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४५ अंशाच्या आसपास असल्याने मतदार सकाळीच बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
माजी महसूलमंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी सकाळी ८.३५ वाजता संगमनेर तालुक्यातील आपल्या जोर्वे गावात सहपत्नीक मतदानाचा हक्क बाजवला आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरीषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील अहमदनगर दक्षीणेचे भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील, पत्नी धनश्री विखे यांनी परीवारासह लोणी येथील आहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजता येऊन मतदानाचा हक्क बाजवला आहे.