अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. अशात बेडची कमतरता असताना कोरोना लस देखील संपली असल्याने लसीकरण थांबले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंधांच्या नावाखाली लॉकडाऊन केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या, तालुक्यात खळबळ
बेडची कमतरता तर लस अभावी लसीकरण थांबले
नगर जिल्ह्यात आज अखेर अकरा हजारांवर कोरोनाबाधित असून नगर शहर, राहता, संगमनेर ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरत आहेत. या परस्थितीत जिल्हा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह अनेक शासकीय कोविड केअर सेंटर्सवर बेडची उपलब्धता नसल्याने रुग्ण बेडच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र संभाव्य रुग्णसंख्या पंधरा हजार गृहीत धरून पुरेसे बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा याचे नियोजन केल्याचा दावा केला आहे. मुख्य म्हणजे, वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना लसीकरणासाठी गर्दी उसळली असताना लसी संपल्याने लसीकरण थांबवावे लागले आहे.
व्यापारी वर्गाचा दोन दिवसांचा इशारा
दुसरीकडे कडक निर्बंधांच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन केल्याचा आरोप व्यापारी वर्गातून होत आहे. नगर शहरातील कापड बाजारासह व्यापारी आस्थापने, छोटे दुकानदार यांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे, व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी असून त्यांनी किमान ठराविक वेळ अथवा दिवस दुकाने उघडी ठेवण्याची मागणी करत मागणी मान्य न झाल्यास दुकाने, आस्थापना सुरू करू, असा इशारा दिला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांत नगर जिल्हा पहिल्या दहात आहे. अशात एकीकडे आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असताना लसीकरण थांबल्याने नागरिकांत चिंता आहे. तर, कडक निर्बंधाखाली सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी, कामगार, मजूर वर्गात तीव्र नाराजी आहे. सद्याची परस्थिती सांभाळाला पोलीस, जिल्हा आरोग्य, मनपा प्रशासनाला खूप मेहनत करावी लागत आहे.
हेही वाचा - संगमनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबीयांसाठी 1 कोटी 12 लाख 84 हजार खावटी अनुदान मंजूर