श्रीरामपूर : कोरोना तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्वॅब स्टीकसह इतर तपासणीचे साहित्य योग्य विल्हेवाट न लावता प्रवरा नदीच्या प्रवाहानजिक फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकर श्रीरामपुरातून समोर आला आहे. या स्वॅब स्टिक कुणी फेकल्या हे कळू शकले नसले तरी यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर या प्रकरणी तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आता होताना दिसत आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बेलापूर येथील प्रवरा नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणीसाठी वापरले जाणारे किट, सलाईन, हातमोजे, मास्क, सिरींज आदी वापरलेले साहीत्य आढळून आले. येथील ग्रामस्थ अशोक बडधे यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चोखर यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. यात रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी लागणारे साहीत्य आढळून आले असून एखाद्या खासगी लॅब चालकाचे हे कृत्य असावे अशी शंका त्यांनी व्यक्त केली. असे सर्व साहीत्य नष्ट करण्याच्या कठोर सूचना सर्व तपासणी प्रयोगशाळांना देण्यात आलेल्या आहेत. हे साहित्य या ठिकाणी आणून टाकणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार असल्याचेही चोखर यांनी सांगितले,
नागरिकांच्या जीवितास धोका
कोरोना तपासणीचे साहीत्य नष्ट करणे आवश्यक असतानाही अज्ञाताने ते सर्व साहित्य अशा रितीने फेकून दिल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी मासेमारी करणारे बांधव रोज मासे धरण्यासाठी येत असतात. शिवाय ज्या ठिकाणी हे सामान टाकले तेथून जवळच स्मशानभुमी आहे. त्यामुळे हे सर्व साहित्य योग्य रितीने नष्ट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.