अहमदनगर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या रविवारी श्रीरामपूर दौऱ्यावर येत आहेत. इच्छामणी मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करणार आहेत. तसेच पीक विमा व दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती घेणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात असून उध्दव ठाकरे यांच्या श्रीरामपूर दौऱ्यामुळे श्रीरामपूर विधानसभेची जागा शिवसेनेलाच निश्चित असल्याचे संकेत आहे. लोकसभा निवडणुका दरम्यान काहींचा राजकीय प्रवेश घडल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही युवा नेते ‘शिवबंधन’ बांधणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या दौऱ्याच्या निमित्ताने उध्दव ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणीही करण्याची शक्यता आहे.
शेतकरी, मजूर सेनेच्या घोषणेची शक्यता
शिवसेनेने विविध घटकांना न्याय देण्यासाठी विविध संघटनांची स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी, शेतमजुरांनाही न्याय देण्यासाठी सेना स्थापन करावी अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.