अकोला - अंदुरा येथील दोन युवक 13 ऑगस्टला नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. पाच दिवसांपासून त्यांचा शोध संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाकडुन सुरू आहे. हे पथक मुक्ताईनगर येथील पूर्णा नदीपात्रात आज शोध घेत आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की अंदुरा येथील 13 ऑगस्टला दुपारी विनोद गोपणारायण हे मोर्णा नदीच्या पुरात वाहून गेले. तसेच अंदुरा येथील शुद्धोधन देवराव डीगे पुलावरुन पुर्णा नदीपात्रात कोसळून ते पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेले. तेव्हापासून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात दोन्ही लोकांना शोधण्यासाठी मोठ्या युद्ध पातळीवर सर्च ऑपरेशन चालु करण्यात आले आहे.
बुधवारपासुन मुक्ताई नगर (जि. जळगाव) खांन्देश येथे तापी आणि पूर्णाच्या नदीपात्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे. या दोघांचा तपास लावण्यात अद्यापही यश आले नाही. प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू आहेत. तर, त्यांचे नातेवाईकही या दोघांच्या शोधासाठी दिवसरात्र एक करीत आहे.