संगमनेर - तालुक्यातील साकूर येथील सेंट्रल बँकेत एका जणाच्या खिशातून पंधरा हजार रुपये लंपास करणाऱ्या दोन चोरट्यास नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप देत, घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर एक जण पळून गेला आहे. ही घटना बुधवारी दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.
दोन जणांना अटक, एक फरार
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साकूर जवळील चिंचेवाडी येथील ठकाजी रामभाऊ खेमनर हे शेतकरी आपले वडील रामभाऊ यांना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पैसे काढण्यासाठी साकूरच्या सेंट्रल बँकेत घेवून आले होते. त्यावेळी ठकाजी हे पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांचे वडील बाजूला बसले होते. त्याचदरम्यान त्याठिकाणी पाळत ठेवून असलेल्या तिघांनी त्यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये काढून घेतले. मात्र रामभाऊ यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी या तिघांना पाहिले होते, त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने या चोरट्यांना पकडे, मात्र यातील एक जण पळून गेला. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, आरोपींना ताब्यात घेतले आहे. उस्वाल इम्पीरियल चव्हाण रा. वाळुंज पारगाव ता. अहमदनगर, जीरीप भगवान भोसले रा. अरणगाव रोड अहमदनगर अशी या दोघांनी नावे आहेत. तर अन्य एक पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.