शिर्डी (अहमदनगर) - कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या समृद्धी महामार्गाच्या शेजारी विद्युत ताराचा स्पर्श होऊन दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धनश्री मंगेश पालवे (वय ५) व प्रगती नितीन आव्हाड (वय ९) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जेऊर कुंभारी गावावर शोककळा पसरली आहे.
मंगेश पालवे हे त्यांच्या घरच्यांसोबत नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या जेऊर कुंभारी पेट्रोल पंपाजवळ आंबे विक्री करतात. ते काल (रविवार) नेहमीप्रमाणे दुकान लावले. त्यांना या कामी मुलगी धनश्री आणि तिची मावस बहिण प्रगती मदत करतात. ते दिवसभर आंबे विक्री करून सायंकाळी सहा वाजल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. ते समृध्दी महामार्गाचे काम सुरू असलेल्या वाटेवरुन निघाले होते.
महामार्गाच्या कामासाठी त्या रस्त्यावर भराव घालण्यात येत आहे. यामुळे या परिसरात असलेल्या विद्युत तारा आणि जमीन यातील उंची कमी झाली आहे. सद्या त्या तारांची उंची जमिनीलगत आहे. अशा ताराचा संपर्क धनश्री आणि प्रगती यांच्याशी आला आणि त्यांना जोराचा विद्युत झटका बसला. यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मुलींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने सुरक्षा रक्षक तैनात करून खबरदारी घेतली असती तर ही घटना घडलीच नसती, असे जेऊरकुंभारी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच लवकरात लवकर याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून ठेकेदाराने खबरदारी घ्यावी अन्यथा काम बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५४, अठरा जणांवर उपचार सुरू
हेही वाचा - हैदराबादवरुन शिर्डीला येणारे इंडिगो एअर लाईन्सचे विमान रद्द; 29 प्रवासी करणार होते प्रवास