अहमदनगर - राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील प्रवरा नदीकाठी असलेल्या विहिरीचा भराव खचल्याने बाप लेक त्याखाली दबले गेले होते. यातील मुलाला वाचविण्यात यश आले असून वडिलांचा गेल्या चौदा तासांपासून शोध सुरू आहे.
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथे प्रवरा नदीकाठी असलेल्या एका विहिरीचा भराव गुरुवारी खचल्याने बाप-लेक त्या भरावाच्या ढिगार्याखाली दबले. मुलाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. मात्र, वडिलांचा शोध जेसीबी मशिनच्या साह्याने रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होता. तरीही ते सापडले नाही. आता पुन्हा सकाळी ही शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
दाढ बुद्रुक येथील शेतकरी रामभाऊ भगवंता गाडेकर (वय-45) यांची प्रवरा नदीकाठी विहीर आहे. काल रामभाऊ गाडेकर व त्यांचा मुलगा राहुल हे दोघेही विहिरीत मोटार सोडण्यासाठी गेले होते. त्यांच्या मदतीला आणखी दोन जण होते. मोटार सोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हे चौघेही माघारी येत असताना विहिरीत काही तरी पडण्याचा आवाज झाला. त्यामुळे रामभाऊ गाडेकर व त्यांचा मुलगा राहुल (वय 17) हे माघारी आले. सिमेंटचे कठडे बांधलेल्या विहिरीच्या काठावर उभे राहुन विहिरीत काय पडले हे पहात असतानाच रामभाऊ यांच्या पायाखालचा भराव अचानक खचला. ते खाली जात असल्याचे पाहुन मुलगा राहुलने त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला. त्यात तोही खड्ड्यात कोसळला. त्यांच्या आवाजामुळे त्यांच्यासोबत असलेले इतर दोघेही मदतीला धावले. तोपर्यंत रामभाऊ मातीच्या ढिगार्याखाली पूर्णपणे दबले होते. तर राहुल कंबरेपर्यंत दबला होता. दोराच्या सहाय्याने राहुलला बाहेर काढण्यात आले. विहिरीशेजारी टाकलेल्या दगडांचा भरावही त्यांच्या अंगावर आल्याने राहुल जखमी झाला. त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन बंबासह पथक मदतीसाठी आले होते. नागरिकांच्या मदतीने जेसीबी मशिनच्या साह्याने विहिरीच्या कडेला असलेला भराव दूर करून भरावाखाली दबलेल्या रामभाऊ गाडेकर यांचा शोध सुरू होता. रात्री उशिरापर्यंत ढिगार्याखाली दबल्या गेलेल्या रामभाऊ गाडेकर यांचा शोध सुरू होता. मात्र, ते मिळून आले नव्हते आता पुन्हा शोध सुरू करण्यात आलाय.