अहमदनगर- जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी २५ सुसज्ज आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने गंभीर रुग्णावर तत्काळ उपचार शक्य होणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात यापूर्वी आयसीयू कक्षात २६ बेडची व्यवस्था होती. आता नव्या २५ बेड मुळे एकूण ५१ आयसीयू बेड्सची व्यवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही व्यवस्था लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य यंत्रणेने तत्काळ कार्यवाही करुन वेळेत हे काम पूर्ण केले आणि येथील आयसीयू यंत्रणा वेळेत कार्यान्वित केली.
शहरासह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत साठ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त ट्रेसिंग आणि टेस्ट घेतल्या जात असून गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना तातडीने आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन प्रयत्न करत आहे.
अहमदनर जिल्ह्यातील कोरनोबाधित रुग्णांची संख्या ४६१३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत 60 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. २९४९ जण कोरोनामुक्त झाले असून १६०४ जणांवर उपचार सुरु आहेत.